पुणे, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी (दि. 27) ऑनलाईन माध्यमातून जाहीर केला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. तर राज्याचा एकंदरीत निकाल 95.81 टक्के लागला आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.01 टक्के लागला असून नागपूर विभागाचा सर्वात कमी 94.73 टक्के निकाल लागला आहे. 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 23 हजार 288 शाळांपैकी 9 हजार 382 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नियमित विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 95.81 आहे.
तर राज्यात 25 हजार 327 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 12 हजार 958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 51.16 टक्के आहे.
विभागनिहाय निकाल (टक्क्यांमध्ये) –
पुणे – 96.44
नागपूर – 94.73
छत्रपती संभाजीनगर – 95.19
मुंबई – 95.83
कोल्हापूर – 97.45
अमरावती – 95.58
नाशिक – 95.28
लातूर – 95.27
कोकण – 99.01