दिल्ली, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – क्रेंद्रीय निवडणूक आयोग उद्या शनिवारी दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुका ७ ते ८ टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच निवडणूक आयोग उद्या ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर करणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी आज शुक्रवारी निवडणूक आयोगात रुजू होऊन कामकाजाची सुत्रे हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय समितीने ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली आहे. अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त म्हणून तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजीव कुमार हे एकच निवडणूक आयुक्त होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्रिसदस्यीय समितीने या नावांची निवड केली आहे. या दोन्ही नावांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. या संदर्भातील अधिसूचना कायदा मंत्रालयाद्वारे काढण्यात आली होती.