पिंपरी, (हॅलो महाराष्ट्र न्यूज ) – औद्योगिक कंपन्या हा आर्थिक कणा आहेत, तर या शहरातील कामगार हा पिंपरी-चिंचवडचा आत्मा आहेत. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी आणि कामगारांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहीन, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी कामगारांना दिला. यावेळी शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही सोबत असल्याचा विश्वास कामगार बांधवांनी दिला आहे.
शहरातील औद्योगिक क्षेत्राचा पाया असलेल्या टाटा मोटर्स कंपनीतील तीनही मुख्य प्रवेशद्वारांवर भाजपा-शिवसेना-एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी कामगारांशी संवाद करीत निवडणूक प्रचाराची सांगता केली. यावेळी कामगार युनियनचे प्रमुख प्रतिनिधी, कामगार आणि अधिकारी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्रातील जीवनवाहिनी आणि शहराचा आर्थिक कणा असलेल्या टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांची भूमिका कायम निर्णायक राहिली आहे. कामगार वर्ग आणि उद्योगविश्वातील मान्यवरांना भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीत साथ द्यावी, असे आवाहन केले. कंपनीच्या तीनही मुख्य प्रवेशद्वारावर कामगार संघटना आणि प्रतिनिधी यांच्यासह कामगार बांधकांशी संवाद साधला. या निवडणुकीत कामगारांची साथ निश्चितपणे माझ्यासोबत आहे, असा विश्वास आहे.
***
कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा दिला विश्वास…
पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासामध्ये उद्योग क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भूमिपुत्रांच्या त्यागातून आणि कामगारांच्या घामातून हे शहर उभा राहिले. त्यासाठी उद्योगविश्वाची साथ मिळाली. आगामी काळात पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुल येथे कामगार न्यायालय सुरू करण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. कामगारांसाठी ईएसआयसी हॉस्पिटल सुरू करणार आहे. कामगार संघटनांच्या माध्यमातून कामगार वेतनवाढ करार, यासह विविध समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामगार-कष्टकऱ्यांना माफक दारामध्ये हक्काचे घर शहरामध्ये उपलब्ध होईल. यासाठी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा आमचा संकल्प आहे, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी कामगार बांधवांना दिला आहे.