– संजोग वाघेरेंना संसदेत पाठवून विजयाचा गुलाल उधळू
– पनवेलमध्ये काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात !
पनवेल, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) :- इंडिया आघाडीला मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून देशात बदलाचे वारे वाहत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करून लोकसभेत पाठवू. त्यांचा विजय हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करणारा असेल, असे मत शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराव पाटील यांनी व्यक्त केले. ते पनवेल येथील काँग्रेसच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात आज, शुक्रवारी (२६ एप्रिल) बोलत होते.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, पक्षाचे जेष्ठ नेते बबन पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सदस्य आर. सी. घरत, पनवेल काँग्रेसचे युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला काँग्रेस अध्यक्षा निर्मला म्हात्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनंत पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक लतिफ शेख, पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठवले, काँग्रेसच्या माजी नगरसेविका शशिकला सिंग, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर, कॅप्टन कलावत यांच्यासह काँग्रेस, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेंद्र घरत म्हणाले, पेन्शनधारक, शेतकरी, महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी यावर हे सरकार काही बोलत नाही. त्यामुळे जगाला माहिती झालेले आहे की मोदीजी थापा मारतात. ही निवडणूक भारतीय संविधान वाचवण्याची आहे. संविधान वाचवायचे असेल, तर हुकूमशाही सरकारला खली खेचले पाहिजे. आता ही लढाई राहुल गांधींना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. म्हणून हेवे दावे, मानपान सोडून द्या, राहूल गांधी, उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघात “मशाल” चिन्ह घरा घरात पोहोचवा.
सुदाम पाटील म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील म्हणजेच आपणच प्रत्येक जण उमेदवार आहोत. हे समजूनच सर्वांनी मावळ मतदारसंघात मशाल चिन्हाचा प्रचार करावा आणि 13 मेपर्यंत हे चिन्ह लोकांच्या मनामनात बिंबविण्याचे काम करावे.
जी. आर. पाटील म्हणाले, आम्हाला खूप धमक्या येतात. आम्ही कोणाच्या धमकीला घाबरत नाही. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. गेल्या दहा वर्षात आपल्या पनवेल भागात एकही विकासात्मक कामे झाली नाहीत. त्यामुळे विचार करण्याची वेळ आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे आणि उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे.
*ही निवडणूक देशाच्या स्वाभिमानाची लढाई आहे – संजोग वाघेरे*
लोकसभेची निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. ही निवडणूक देशाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. काँग्रेसच्या काळात काळात गॅस सिलेंडर किती होता. आज जनता महागाईने त्रासली आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर हे सरकार घाव घालत आहे. त्यामुळे आता या सरकारला जाब विचारायचा आहे. म्हणून मतदारांनी जागे झाले पाहिजे. आज पनवेल सारख्या शहरात तीन तीन दिवस पाणी येत नाही. गेल्या दहा वर्ष राहिलेल्या खासदारांचा नाकर्तेपणा आहे. एवढेच काय तर पिंपरी चिंचवड शहरात गेल्या वर्षात एक तरी काम दाखवावे त्यामुळे येथील नागरिकांना याचा फायदा झाला आहे. तथाकथित खासदारांचा 2014 ला 65 कोटींची मालमत्ता होती. आज 2024 मध्ये 260 कोटींची वाढ झाली म्हणजे पन्नास खोके…एकदम ओक…असेच झाले आहे. पनवेल शहरात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी एखादे सुसज्ज हॉस्पिटल तरी आहे का ? जी कामे झाली पाहिजे होती, ती झालेली नाहीत. येथील वाहतूक वेवस्थेवर नियंत्रण नाही, रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत. त्याही झाल्या नाही. नवीन ट्रॅक टाकले पाहिजे होते. ते ही टाकले गेले नाहीत. ज्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविल्या नाहीत, त्यांना मत मागण्याचा काहीही अधिकार नाही, अशी टीका यावेळी संजोग वाघेरे यांनी केली. मी विश्वासाने सांगतो तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिल्यावर मतदारसंघाचा कायापालट करून दाखवू. शहर, गाव असो किंवा प्रभाग सर्व ठिकाणी आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करू, असेही ते म्हणाले.