महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पिंपरीगावातूनच ‘घरचा आहेर’!
*घरासमोरील रस्ता काँक्रीटचा करता आला नाही तो काय मावळचा विकास करणार – संदीप वाघेरे
पिंपरी,(हॅलो महाराष्ट्र न्यूज) – महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आतापर्यंत केलेली विकास कामे दाखवा आणि प्रत्येक कामासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जिंका, असे जाहीर आव्हान माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिले. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पिंपरीगावातून मिळालेला हा ‘घरचा आहेर’ मानण्यात येत आहे. स्वतःच्या घरासमोरील रस्ता कॉंक्रिटचा करता आला नाही, तो काय मावळचा विकास करणार, असा सवालही त्यांनी केला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा झाली. त्यात संदीप वाघेरे यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले.
संदीप वाघेरे यांनी नाव न घेता महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही आणि काम करून घेण्याची पद्धतही त्यांना माहीत नाही. त्यामुळेच पिंपरी गावाचा विकास रखडला होता. आपण नगरसेवक झाल्यानंतर म्हणजेच 2017 नंतर पिंपरी गावाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे, असे ते म्हणाले.
घरात अनेक वर्ष सत्ता असतानाही त्यांनी पिंपरी गावात एकही भरीव विकास प्रकल्प आणला नाही, असा आरोप संदीप वाघेरे यांनी केला. त्यांनी पिंपरीत केलेले एक काम दाखवा, मी प्रत्येक कामाचे एक लाख रुपये देईन, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. पिंपरी गावातील रस्त्यांची पूर्णपणे दुरावस्था झाली होती. स्वतःच्या घरासमोरील रस्ता काँक्रीटचा करता आला नाही, त्यांनी मावळच्या विकासाच्या गप्पा मारू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी लागणार होती. त्यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र दिले होते. काम कोणत्या विभागाशी संबंधित आहे. याची साधी माहितीही त्यांना नाही. आपण खासदार बारणे यांच्यामार्फत संरक्षण खात्याकडे पाठपुरावा केल्यानंतर ते काम मार्गी लागले आहे. या उड्डाणपुलाचे उद्घाटन लवकरच बारणे यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी घोषणाही संदीप वाघेरे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी असलेला निधी त्यांनी कोणाच्या पुतळ्याच्या कामासाठी वर्ग केला होता, हे संपूर्ण पिंपरीगावाला माहीत आहे, असेही संदीप वाघेरे म्हणाले. पिंपरीगावात 55 हजार मतदार असून ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून देतील, असा इशाराही त्यांनी दिला.