बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार
पिंपरी,(हॅलो महाराष्ट्र न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शेवटच्या चार दिवसांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करून पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी आपापल्या बुथवर “मेरा बूथ सबसे मजबूत” संकल्पना राबविणार आहेत, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक बूथ जिंकण्यासाठी विजयी 51 टक्के मतदान होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार अश्विनीताई जगताप, चिंचवड विधानसभा निरीक्षक जालिंदर कामठे, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, मावळ लोकसभा विस्तारक भूषण जोशी, चिंचवड विधानसभा विस्तारक सागर फुगे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते आदी मान्यवर उपस्थित होते.
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यांना पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदार संघातून दीड लाखाहून अधिक मताधिक्य देवून निवडून आणण्यासाठी भाजपने बूथ स्तरावर सूक्ष्म नियोजन केले आहे. बूथनिहाय मतदार चिठ्ठ्या वाटणे, बूथ प्रतिनिधी, मतदारांसाठी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी मंडल अध्यक्ष, बूथ समिती तसेच पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.