पिंपरी, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या सूचनेनुसार पिंपरी ते शिवाजीनगर कोर्ट या स्थानकांदरम्यान काल मेट्रोतून प्रवास करत मतदान जनजागृती करण्यात आली.
यावेळी मेट्रो व्यवस्थापनाचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी स्वतः मेट्रोनी प्रवास केला आणि प्रवाशांना “मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून लोकशाही बळकट करण्यासाठी शहरातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही महोत्सवात सहभागी व्हावे” असे आवाहन केले तसेच मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनातून पुणे मेट्रोने स्थानकांवर आणि मेट्रो गाड्यांमध्ये मतदान जनजागृती करणारी पत्रके लावण्यात आलेली आहेत, त्यामुळे दररोज प्रवास करणा-या ८० हजारांहून अधिक मेट्रो प्रवाशांमध्ये मतदान करण्याविषयी जागृती निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात पिंपरी विधानसभा कार्यालयाचे नोडल अधिकारी मुकेश कोळप आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक सहभागी झाले होते त्यांनी देखील मेट्रोमध्यील प्रवाशांना लोकसभा निवडणूक मतदानाविषयी तसेच मतदान केंद्रावर मतदार,दिव्यांग मतदार, महिला मतदारांसाठी असणा-या सोईसुविधांची माहिती दिली.
मेट्रोतील प्रवाशांनी प्रवासादरम्यान “लोकशाहीवर निष्ठा ठेवून कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदानाचा हक्क बजावण्याची” शपथ घेत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी मेट्रो व्यवस्थापनाचे मनोजकुमार डॅनियल,धनराज गोखले, विनोद सोळंकी,अभिषेक शहादाणी,शुभम दळवी तर पिंपरी विधानसभा कार्यालयाचे महालिंग मुळे,दिनेश जगताप, राजेंद्र कांगुडे,संदीप सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.