थेरगाव,(हॅलो महाराष्ट्र न्यूज ) – निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात सहभागी होऊन सर्वांनी मतदान करावे आणि लोकशाहीमधील सर्वात महत्वाचे कर्तव्य बजवावे. त्यामध्ये तरुणांचाही महत्वाची भूमिका असून १८ वर्षे वय पुर्ण झालेल्या व मतदार यादीत नाव असलेल्या नवमतदारांनीही येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपले मौल्यवान मत देऊन देशाच्या तसेच शहराच्या विकासात हातभार लावावा. तसेच आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील मतदारांनाही यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले.
चिंचवड विधानभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या स्वीप टीमच्या वतीने काळेवाडी येथील मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निक कॉलेज या महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला, त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार बोलत होते.
या कार्यक्रमास स्वीप टीमचे समन्वय अधिकारी राजीव घुले, दिपक यन्नावार, मनोज माचरे, अंकुश गायकवाड, गणेश लिंगडे, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे, पांडुरंग जाधव, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, संजू भाट, विजय वाघमारे तसेच महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी १८ वर्षे पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच त्यांच्यामार्फत त्यांच्या पालकांना देखील मतदानाचे महत्व पटवून देऊन येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी १०० टक्के मतदान करणार असल्याची शपथ देखील घेतली. यादरम्यान अनिल पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मतदानाविषयक किंवा निवडणूक विषयक प्रश्न, शंका यांचे निरसन देखील केले.