पिंपरी, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – उन्हाळा सुरु झालेला आहे. येणारा पावसाळा जून मध्ये सुरु होईल यांची शाश्वती नाही. पावसाळा हा विलंबाने सुरु झाल्यास पाण्याची टंचाई शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणी आतापासून सर्व नागरिकांनी काटकसरीने व जपून वापरणे अत्यावश्यक आहे. यासाठी पिण्याचे पाण्याचा गैरवापर टाळणे, पाण्याची उधळपट्टी थांबविण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पिण्याचे पाणी हे घरगुती वापरासाठी योग्यरित्या व काटकसरीने वापरावे. पाणी हे शिळे होत नसल्याने शिल्लक असलेले पाणी फेकून देऊ नये, त्याचा वापर करावा तसेच, पिण्याचे पाणी हे वाहने स्वच्छ करणे, बागकाम व कुंड्यासाठी, घर / इमारत व परिसर स्वच्छ करणेसाठी, धुण्यासाठी वापर करु नये. तसेच, सर्व सोसायटी धारकांनी एस.टी.पी. व बोअरवेल सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सदनिकांनामध्ये स्वच्छतागृह, सोसायटी अंतर्गत उद्यान परिसराची स्वच्छता इत्यादीसाठी वापरावे.
जेणेकरुन पिण्याचे पाण्याची बचत होईल. पिण्याचे पाण्याचा गैरवापर आढळल्यास म्हणजे गाड्या धुणे, रस्ते धुणे, घर, सोसायटी परिसर पुणे यासाठी करत असल्याचे निदर्शनास आलेस सदर ग्राहकांना गैरवापर होत असलेबाबत प्रथमतः नोटीस बजाविणेत येईल.
पुन्हा दुस-यांदा असा पिण्याचे पाण्याचा गैरवापर करताना आढळल्यास कोणतीही सबब, ऐकूण घेतली जाणार नाही व तात्काळ नळजोड तोडण्यात येईल. पाणी हे जीवन आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. ते जपून वापरावे म्हणजे पाण्याची बचत होईल. येणा-या पावसाळ्यापर्यंत म्हणजे जून व जुलै पर्यंत पाणी सर्वांना पुरेसे उपलब्ध होऊ शकेल व पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही व यंदाचा उन्हाळा सर्वांना सुसह्य जाईल.
पाण्याची बचत याप्रमाणे करा
पिण्याचे पाणी वाहने स्वच्छतेकरिता वापरु नका.
अंगण / जिने / फरशी धुणे टाळा स्वच्छते करिता कमीत कमी पाण्याचा वापर करा.
घरातील गळणारे नळ तत्काळ दुरुस्त करुन घ्या.
घरासमोरील रस्त्यावर पाणी मारु नका / रस्ते धुवू नका.
कुंड्यातील झाडे / बागकामासाठी पिण्याचे पाण्याचा वापर करु नका.