पिंपरी, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – सात वर्षाच्या मुलीचा खून करून वडिलांनीही आत्महत्या केली. ही घटना गुरूनानकनगर, थेरगाव येथे मंगळवारी (दि. १९) पहाटे उघडकीस आली. नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ७) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तर तिचे वडिल भाऊसाहेब भानुदार बेदरे (वय ४५) यांनीही आत्महत्या केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब यांची पत्नी काही कारणानिमित्त गावी गेली होती. पहाटे चार वाजताच्या सुमारास तिने आपला पती भाऊसाहेब यांना फोन करून आपल्याला नेण्यासाठी या, असे सांगितले. मात्र भाऊसाहेब हे आलेच नाहीत. त्यामुळे त्या स्वतः घरी आल्या. दरवाजा वाजविल्यानंतर त्यांच्या १४ वर्षाच्या मुलाने दरवाजा उघडला. त्यावेळी त्याच्या आईने वडिल कोठे आहेत? मला ते न्यायला का आले नाहीत? याबाबत विचारणा केली. मात्र वडिल घरात असल्याचे मुलाने सांगितले.
त्यानंतर भाऊसाहेब यांच्या पत्नीने घरातील त्यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने मुलीच्या डोक्यावरील चादर उघडून पाहिली असता तिचा खून केल्याचे दिसून आले. ही घटना पाहताच भाऊसाहेब यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. त्यामुळे जमा झालेल्या नागरिकांनी त्वरीत पोलिसांना पाचारण केले.
भाऊसाहेब हे छोटे–छोटे बांधकामाचे ठेके घेतात. मात्र आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.