शिरूर, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – शिरूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. दिलीप मोहिते पाटील यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली. मोहिते आणि अजित पवार यांच्यात नुकतीच बैठक पार पडली, यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. अजित पवारांच्या विनंतीचा आपण मान राखणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना मोहिते म्हणाले, आढळराव आणि आमच्यामध्ये जो संघर्ष होता, तो अतिशय पराकोटीचा संघर्ष होता याचा माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आढळरावांसोबत जाण्याबाबत अनेक शंका-कुशंका होत्या. त्यांच्या मनातील हा संभ्रम अजित पवारांनी दूर करावा यासाठी त्यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली. माझ्या घरीच ही बैठक पार पडली. यावेळी अगदी मनमोकळेपणाने त्यांच्याशी कार्यकर्त्यांसह चर्चा झाली.
वळसे पाटलांनी सुद्धा नरमाईची भूमिका घेतली
आढळराव पाटील यांची राजकीय कारकीर्द आंबेगाव तालुक्यात सुरू झाली. याठिकाणी वळसे पाटलांचा त्यांच्याशी कायम संघर्ष राहिला होता. पण वळसे पाटलांनी यामध्ये स्वत:ची भूमिका बदलली आहे. त्यामुळे मलाही यात काही वाटत नाही, शेवटी पक्षासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आज मी जो कोणी आहे तो केवळ अजित पवारांमुळे आहे. जर अजित पवार हे माझे कुटुंबप्रमुख असतील तर मला त्यांचं ऐकावं लागेल. यापूर्वी मी म्हटलं होतं की, पक्ष जरी आढळरावांसोबत गेला तरी मी जाणार नाही. पण आता अजित पवारांनी माझ्या कार्यकर्त्यांसह सर्वांशी मनमोकळी चर्चा केली. त्यामुळे मी तडजोड करायला तयार आहे.