चिंचवड, (हॅलो महाराष्ट्र न्यूज)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्वराज्य स्थापना आणि स्वराज्याच्या कारभारात ज्या घराण्यांचा महत्वाचा सहभाग होता, त्या घराण्यांच्या वंशजांचा सन्मान चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांचे शिवराज्याभिषेक विषयावर व्याख्यान झाले.
श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर पटांगणात रविवारी (दि. 26) झालेल्या कार्यक्रमासाठी मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, विश्वस्त जितेंद्र देव, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज श्रीनिवास इंदलकर, सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजित जेधे, सरदार येसाजी कंक यांचे वंशज रवी कंक, सरदार पिलाजी सणस यांचे वंशज बाळासाहेब सणस, सरदार जयताजी करंजावणे यांचे वंशज गोरख करंजावणे, सरदार कृष्णाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल यांचा सन्मान करण्यात आला.
शिवव्याख्याते सौरभ कर्डे आपल्या व्याख्यानात म्हणाले, मोरया गोसावी यांनी एका कुष्ठरोग्याला बरे केले होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला लागलेला मुघल नावाचा कुष्ठरोग नष्ट केला. त्यामुळे आजचा कार्यक्रम म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम वाटतो. स्वराज्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे राज्याभिषेक होय. स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले सांघिक यश आहे. स्वराज्यात प्रत्येक मावळ्याचे योगदान महत्वाचे आहे. देव, देश, धर्म, संस्कृती रक्षण शिवाजी महाराजांनी केले.
सौरभ कर्डे पुढे म्हणाले, “शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तीन पायऱ्या आहेत. 6 जून 1674 रोजी सुरुवातीला शिवाजी महाराज यांना अभिषेक करण्यात आला. त्यावेळी ते अभिषिक्त झाले. त्यानंतर महाराज सिंहासनावर स्थानापन्न झाले. त्यावेळी ते सिंहासनाधिश्वर झाले. तर तिसरी पायरी म्हणजे महाराजांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले. त्यावेळी ते छत्रपती झाले. हा तीन पायऱ्यांचा प्रवास म्हणजे ज्या मावळ्यांनी, सरदारांनी स्वराज्य स्थापनेत साथ दिली, ज्या रयतेसाठी स्वराज्याची स्थापना होत आहे त्या प्रत्येक मनात मनात दृढविश्वास निर्माण करत बहुत जनांसी आधारू ठरणारा असा हा प्रवास आहे. हा राज्याभिषेक म्हणजे रयतेच्या मनामनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलीत करणारा असल्याचे सांगत कार्यक्रमात उपस्थित वंशजांच्या सर्व सरदारांचा इतिहास आणि त्यांच्या शौऱ्याची माहिती कर्डे यांनी दिली.
रवींद्र कंक यांनी सत्काराला उत्तर देताना प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. श्री मोरया गोसावी संजीवन समाधीचे दर्शन सत्काराच्या निमित्ताने झाले याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. चिंचवड देवस्थान ट्रस्ट खूप चांगले काम करत आहे. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे होण नाणे चलनात आले. शिवरायांनी शक ही कालगणना सुरू केली असे सांगत कंक यांनी स्वराज्याविषयी माहिती दिली.
अथर्व कुलकर्णी यांनी पोवाडा सादर केला. जितेंद्र देव यांनी प्रास्ताविक आणि आभार व्यक्त केले. देवदत्त भिंगारकर यांनी सूत्रसंचालन केले. समीर वरेकर यांनी शिववंदना सादर केली. शिववंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.